नवरंग मनाचे – (1/9)
नऊ दिवस, नऊ भावना, आणि स्वतःचा नवा शोध !

नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, रंगांचा उत्सव आणि नवचैतन्याचा उत्सव. पण या उत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्या मनात डोकावून पाहिलं तर? आपल्या भावनांचेही काही रंग असतात. कुणाच्या मनात आनंद फुलतो, कुणाच्या मनात दुःख दाटतं, कुणी रागाशी झुंजतं, तर कुणी भीतीच्या सावलीत जगतं.
या नऊ दिवसांत भेटूया मनाच्या अशाच नऊ भावनांना , त्यांना समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आणि स्वतःशी नव्याने जोडले जाण्यासाठी.

दिवस १ — आनंद.

रंग आनंदाचा: मनाला उमलू देणारी भावना.

नवरात्राची सुरुवात होते ती एका नव्या ऊर्जेने. घरात घटस्थापना होते, वातावरण बदलते, रंग येतात, दिवे लागतात आणि मनातही एक वेगळी प्रसन्नता निर्माण होते. नऊ दिवसांच्या या प्रवासाची सुरुवात आपण आनंदापासून करूया.
आनंद म्हणजे नेमकं काय?
आपण अनेकदा आनंदाची एक सोपी व्याख्या करून ठेवतो की हसणे , मजा करणे, आवडती व्यक्ती भेटणे, एखादे यश मिळणे किंवा मनासारखी गोष्ट घडणे म्हणजे आनंद.
पण आनंद त्यापेक्षा खूप मोठा आहे.
कधी कधी एखाद्या शांत सकाळच्या चहात आनंद असतो. मुलाने अचानक मिठी मारण्यात असतो. खूप दिवसांनी आवडतं गाणं ऐकताना असतो. एखादं काम पूर्ण झाल्यावर येणाऱ्या समाधानात असतो. आणि कधी कधी काहीही विशेष न घडता, फक्त“आज मन शांत आहे”या जाणिवेतही आनंद असतो.
मानसशास्त्र आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते , भावना या केवळ बाहेरच्या घटनांची प्रतिक्रिया नसतात. एखाद्या प्रसंगाला आपण वैयक्तिकरित्या दिलेला अर्थही आपल्या भावनिक अनुभवाला आकार देतो. म्हणूनच नाही का एकाच परिस्थितीत दोन व्यक्तींना पूर्णपणे वेगळे अनुभव येऊ शकतात.
आता पहा ,काही लोक आनंदी होण्यासाठी सतत मोठ्या गोष्टींची वाट पाहतात.
“हे काम झालं ना की आनंदी होईन.”

“पैसे वाढले की आनंदी होईन.”
“मुलांचं सगळं व्यवस्थित झालं की आनंदी होईन.”
“मला हवी ती व्यक्ती आयुष्यात आली की आनंदी होईन.”
आणि अशा प्रकारे आनंद कायम भविष्यात ढकलला जातो.
पण आनंद नेहमी एखाद्या मोठ्या उपलब्धीच्या शेवटी उभा नसतो. तो अनेकदा आयुष्य नावाच्या प्रवासातल्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो.

मानसशास्त्रज्ञ एड डायनर (Ed Diener)यांनीSubjective Well-Beingया संकल्पनेच्या माध्यमातून आनंद आणि जीवनसमाधानाचा अभ्यास केला. त्यांच्या मते, व्यक्तीला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतं, ती किती सकारात्मक किंवा नकारात्मक भावना अनुभवते आणि स्वतःच्या जीवनाबद्दल किती समाधान बाळगते, हे तिच्या व्यक्तिनिष्ठ कल्याणाचे महत्त्वाचे घटक आहेत.
म्हणजेच, आनंद मोजण्यासाठी केवळ आपल्या आयुष्यात किती गोष्टी आहेत हे पाहणं पुरेसं नाही; त्या गोष्टींचा आपण कसा अनुभव घेतो, हेही महत्त्वाचं आहे.

मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमन (Martin Seligman)यांच्या सकारात्मक मानसशास्त्रातीलPERMAया मॉडेलनुसार, समृद्ध जीवनासाठी सकारात्मक भावना, जीवनातील गुंतवणूक, समाधानकारक नाती, अर्थपूर्णता आणि साध्यतेची जाणीव हे पाच घटक महत्त्वाचे आहेत.
• P — Positive Emotions: आनंद, कृतज्ञता, आशा यांसारख्या सकारात्मक भावना.
• E — Engagement: एखाद्या कृतीत पूर्णपणे गुंतून जाणे.
• R — Relationships: अर्थपूर्ण आणि जिव्हाळ्याची नाती.
• M — Meaning: आयुष्याला अर्थ आणि उद्देश असल्याची जाणीव.
• A — Accomplishment: प्रयत्नांमधून साध्यतेचा आणि प्रगतीचा अनुभव.

यातून एक गोष्ट समजते, आनंद म्हणजे केवळ मजा किंवा उत्साह नव्हे. आपल्याला प्रिय असलेल्या माणसांशी जोडलेलं असणं, एखाद्या अर्थपूर्ण कामात मन गुंतणं आणि स्वतःच्या प्रयत्नांमधून समाधान मिळणं, हेही आनंदाचे महत्त्वाचे स्रोत आहेत.
आनंद नावाची मिळकत मिळवण्यासाठी अजून एक अडसर आपल्याला जाणवतो आपल्या मनाला एक गंमत असते. जे आपल्याकडे आहे त्याची सवय होते आणि जे नाही त्याकडे लक्ष जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी हळूहळू “सामान्य” वाटू लागतात.
जसे ,
आरोग्य ठीक, आहे—सामान्य.
आपली माणसं जवळ आहेत—सामान्य.
आजचा दिवस सुरक्षित गेला—सामान्य.
आपल्याला स्वतःसाठी थोडा वेळ मिळाला—सामान्य.
आणि मग आपण आनंदासाठी एखाद्या असामान्य घटनेची वाट पाहतो.
कदाचित आनंद म्हणजे सतत उत्साही राहणे नव्हे. आनंद म्हणजे सामान्य चांगल्या क्षणांना ओळखण्याची मनाची क्षमता.
याचा अर्थ दुःख, राग किंवा चिंता नसाव्यात असा अजिबात नाही. आनंदी व्यक्ती म्हणजे कधीही दुःखी न होणारी व्यक्ती नव्हे. भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीला विविध भावना अनुभवता येतात आणि त्यांच्यातून पुन्हा सकारात्मक अनुभवांकडे वळता येते.
म्हणूनच आनंदाला जबरदस्तीने निर्माण करण्याची गरज नाही.
मग आनंद अनुभवण्यासाठी आपण काय करू शकतो?
• छोट्या, सुखद क्षणांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं.
• आपल्या प्रिय व्यक्तींशी भावनिक नातं जपणं.
• आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढणं.
• स्वतःच्या छोट्या प्रयत्नांचं आणि यशाचं कौतुक करणं.
• आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता अनुभवणं.

आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारुयात,
“माझ्या आयुष्यात आनंद आहे, की मी त्याला ओळखायला विसरले/विसरलो आहे?”
आज काही मोठं करू नका.
फक्त एक छोटा आनंद लक्षात घ्या.
गरम चहाचा पहिला घोट.
आपल्या प्रेमाच्या जवळच्या माणसाचा आवाज.
छोट्या मुलाचे गोंडस , निरागस हसू.
एखादं जुनं गाणं.
झाडावर आलेलं नवीन पान.
किंवा स्वतःसोबत शांत बसलेले पाच मिनिटे.
कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, आनंद नेहमी मिळवायची गोष्ट नसतो.
कधी कधी तो आधीपासून आपल्या आयुष्यात असतो;
फक्त त्याच्याकडे पाहण्याची नजर हवी असते.
शेवटी, आनंद ही अशी भावना आहे जी आपल्याला आयुष्याशी जोडते. ती आपल्याला जगण्यातला उत्साह देते, नात्यांमधील गोडवा जाणवू देते आणि साध्या क्षणांमध्येही सौंदर्य शोधायला शिकवते.
कदाचित आनंदाचं खरं सौंदर्य यातच आहे;आयुष्यात सर्व काही मनासारखं घडत नसतानाही, जे सुंदर आहे त्याचा अनुभव घेता येणं.
आजचा मनाशी संवाद
आज मी कोणत्या एका छोट्या गोष्टीबद्दल मनापासून आनंदी आहे?
आणि त्या उत्तराला लगेच “हे तर काहीच नाही” असं म्हणून नाकारू नका.
कारण मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींची किंमत त्यांच्या आकारावर ठरत नाही.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी ,
स्वतःला आनंदाची परवानगी द्या.
——————–

…..भक्ती जोशी
Psychological counselor and Psychotherapist.
Founder @ All About Mind, Pune.